नवी दिल्ली- राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राफेलच्या करारावरून राहुल गांधींनी अरुण जेटलींवर टीका केली. अरुण जेटलींऐवजी संरक्षण मंत्र्यांनी राफेल प्रकरणावर उत्तर द्यावं, असंही राहुल गांधींनी सांगितलं आहे. जेटलींनी मला शिवीगाळ केली, पण उत्तरं देण्याचं टाळल्याचा उल्लेखही राहुल गांधींनी केला आहे. तसेच राफेल कराराच्या माध्यमातून 30 हजार कोटी रुपये मोदींनी अनिल अंबानींना दिले आहेत. 526 कोटींच्या विमानांची किंमत 1600 कोटी रुपये कशी झाली, याचं भाजपानं स्पष्टीकरण द्यावं. 36 विमानांच्या खरेदीवर हवाई दलालाही आक्षेप होता, असं म्हणत राहुल गांधींनी मोदींला लक्ष्य केलं आहे.हवाई दलाला 126 विमाने हवी असताना केवळ 36 विमानांचाच सौदा का केला? विमानांची संख्या कमी का केली? एकूण 526 कोटी रुपयांचा हा व्यवहार 1600 कोटी रुपयांवर का गेला? हिंदुस्थान एरोनॉटिक्स या सरकारी व अनुभवी कंपनीऐवजी अनिल अंबानी यांच्या अनुभव नसलेल्या कंपनीला ऑफसेट कंत्राट देण्यास नेमका कोणाला रस होता? दसॉल्ट कंपनीच्या पैशातूनच अनिल अंबानी यांनी आपल्या कंपनीसाठी जमीन खरेदी केली, हे खरे नाही का? असे एका पाठोपाठ सणसणीत प्रश्न उपस्थित करत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे.सरकारने 1500 कोटी रुपयांचा व्यवहार करण्याचे ठरविले, तेव्हा संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता, हे खरे नाही काय आणि पंतप्रधानांनी अशा व्यवहारात लक्ष घालू नये, असे नोटिंग या अधिक-यांनी फायलीवर केले होते, हे खरे नाही की काय, असे सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.
जेटलींनी मला शिवीगाळ केली, पण उत्तर देण्याचं टाळलं- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 1:17 PM