नवी दिल्ली : मूत्रपिंडाच्या आजारामुळे शुक्रवारी अखिल भारतीय विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आलेले केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे सोमवारी डायलेसिस करण्यात आले. त्यानंतर, ते दुपारी आपल्या घरी परतले. त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया येत्या काही दिवसांत करण्यात येईल.घरीदेखील त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज राखण्यात आली आहे. त्यांना मधुमेहाचाही आजार आहे. मूत्रपिंडाच्या आजारामुळे गेल्या सोमवारपासून ते कार्यालयातही गेलेले नाहीत. त्यांची राज्यसभेवर फेरनिवड झाली असली, तरी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते सदस्यत्वाची शपथ घेऊ शकलेले नाहीत. सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अरुण जेटली क्रमांक दोनचे मंत्री आहेत. अनेक महत्त्वाची धोरणे ठरवण्यात त्यांचा मोठा सहभाग असतो.एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांचे भाऊ व अपोलो रुग्णालयातील ख्यातनाम किडनीविकारतज्ज्ञ डॉ. संदीप गुलेरिया हे अरुण जेटली यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याची शक्यता आहे. अरुण जेटली यांनी आपले वजन घटविण्यासाठी मॅक्स रुग्णालयात २०१४ साली बॅरियाट्रीक शस्त्रक्रिया करुन घेतली होती. मात्र त्यानंतर प्रकृती अजून बिघडल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. जेटली यांच्यावर पूर्वी हृदय शस्त्रक्रियाही झालेली आहे.
जेटलींवर शस्त्रक्रिया काही दिवसांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 4:10 AM