नवी दिल्ली : यशवंत सिन्हा आणि अरुण जेटली या आजी - माजी मंत्र्यांतील वाद थांबायचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. मी नोकरी मागितली असती तर अरुण जेटली आज अर्थमंत्री पदावर दिसले नसते, असा पलटवार माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला आहे.यशवंत सिन्हा यांनी एक लेख लिहून सरकार आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. अर्थमंत्री जेटली यांनी गुरुवारी यावर उत्तर देत यशवंत सिन्हा यांना फटकारले होते की, ८०व्या वर्षीही सिन्हा हे मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत (नोकरी मागत आहेत). त्यावर सिन्हा यांनी उत्तर देत जेटली यांना आज पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. सिन्हा म्हणाले की, सरकार परिस्थिती समजून घेण्यात अपयशी ठरत आहे.समस्या समजून घेण्याऐवजी स्वत:ची स्तुती करण्यात आणि आपलीच पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानत आहे. जर अर्थव्यवस्थेशी संबंधित काही बाबी असतील तर त्याला अर्थमंत्रीच जबाबदार असतील, गृहमंत्री नव्हे. माझा मुलगा जयंत सिन्हा यांना माझ्याविरुद्ध उतरवून सरकार मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. मीसुद्धा व्यक्तिगत हल्ले करू शकतो. पण, त्यांच्या जाळ्यात फसू इच्छित नाही. पक्षातील अनेक नेते माझ्या मताशी सहमत आहेत. पण, भीतीमुळे ते बोलू शकत नाहीत.हे माझे मत : जयंत सिन्हामाजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी लेख लिहून सरकारवर ताशेरे ओढल्यानंतर त्याला उत्तर म्हणून त्यांचेच चिरंजीव आणि सरकारमधील नागरी उड्डयण मंत्री जयंत सिन्हा यांनी गुुरुवारी उत्तर दिले.मात्र, जयंत सिन्हा सरकारची भाषा बोलत असल्याची टीका झाल्यानंतर आज जयंत सिन्हा यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, मी कुणाच्या सांगण्यावरून बोलत नाही.हा माझ्या अंतरात्म्याचा आवाज आहे. ही अतिशय गंभीर चर्चा असून, ती व्यक्तिगत घेतली जाऊ नये. मुलगा आणि पुत्र या नात्याने याकडे पाहिले जाऊ नये.
...तर जेटली मंत्री झाले नसते, यशवंत सिन्हा यांचा पलटवार; आजी - माजी अर्थमंत्र्यांतील वाद सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 6:11 AM