ग्वाल्हेर - ज्योतिरादित्य शिंदे पक्ष सोडून गेल्याने मध्य प्रदेशकाँग्रेसमधील गटबाजी संपली आहे. तर आत भाजपमध्येच तीन गट तयार झाले आहेत, असा दावा काँग्रेस नेते तथा दिग्विजय सिंह यांचे पुत्र जयवर्धन सिंह यांनी बुधवारी केला. शिंदे यांनी गेल्या वर्षी काँग्रेसला राम-राम ठोकत भाजपचा भगवा हाती घेतला आहे.
मध्ये प्रदेशातील गुनाचे खासदार सिंधिया यांनी मार्च 2020मध्ये भाजपत प्रवेश केला होता. त्यांच्या सोबतच अनेक आमदारांनी काँग्रेसला राम-राम ठोकला होता. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील काँग्रेस सरकार कोसळले होते. यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी पुन्हा एकदा सरकार स्थापन केले. सिंधिया यांना अलीकडेच मोदी सरकारमध्ये नागरी उड्डाण मंत्री करण्यात आले आहे.
ग्वाल्हेर भागातील पूरग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी आलेले माजी मंत्री जयवर्धन सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, "शिंदे होते तोपर्यंत पक्षात गटबाजी होती. आता ती संपली आहे. पण, शिंदे भाजपमध्ये गेल्याने तेथे 'शिवराज भाजप', 'महाराज भाजप' आणि 'नाराज भाजप',असे तीन गट तयार झाले आहेत. यावेळी, ज्या नेत्यांचे फोटो रेशन वितरणासाठी असलेल्या बॅगवर छापण्यात आले होते, त्या नेत्यांवरही टीका केली. "या भागातील लोक पुराचा सामना करत असतानाच, सत्ताधारी पक्षाचे लोक मात्र 'अण्ण उत्सव' साजरा करत आहेत. खरे तर ही योजना काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने सुरू केली होती. एक दिवस भाजपचे हे नेते धान्यावरही त्यांचे फोटो छापतील," असा टोला जयवर्धन सिंह यांनी यावेळी लगावला.