पंजाब : अमृतसरमध्ये ब्रिटिश काळात झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाला आज, 13 एप्रिलला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने याठिकाणी या हत्याकांडातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती वंकय्या नायडू आणि पंजाबचे राज्यपाल शहिदांना श्रद्धांजली वाहणार आहेत.
याचबरोबर, यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सुद्ध अमृतसमध्ये दाखल झाले आहेत. राहुल गांधी सकाळी आठ वाजता शहीदांना श्रद्धांजली वाहणार आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा राहुल गांधी यांनी अमृतसरमध्ये दाखल झाल्यानंतर येथील सुवर्ण मंदिराला दिली भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह उपस्थित होते.
शुक्रवारी रात्री जालियनवाला बाग हत्याकांडातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यपाल व्ही.पी. सिंह बदनौर, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी कॅन्डल मार्च काढला. यावेळी सुखबिंदर सिंह सुखसरकरिया, ओम प्रकाश सोनी, सुनील जाखड, आशा कुमारी, गुरजित औजला, सुनील दत्ती, इंदरबीर बुलारिया, राजकुमार वेरका यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी या कॅन्डल मार्चमध्ये सहभाग घेतला होता.
दरम्यान, जालियनवाला बाग हत्याकांडाला आज 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने शहिदांची आठवण म्हणून नाणे आणि पोस्ट जारी करण्यात येणार आहे.
ब्रिटिश काळात अमृतसरमधील जालियनवाला बागेत 13 एप्रिल 1919 रोजी एका सभेत लोक मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. शहरात लष्करी कायद्याचा अंमल होता, जमावबंदीचा हुकूम काढण्यात आला होता. तरीही लोक त्या सभेसाठी एकत्र जमले. योगायोगाने त्या दिवशी बैसाखीचा सण होता. त्यावेळी जनरल डायर या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याने गोळीबार करण्याचा आदेश दिला. या गोळीबारात अनेक भारतीयांचा मृत्यू झाला होता.