जलपाईगुडी - तृणमूल काँग्रेसलापश्चिम बंगालमध्ये भ्रष्टाचार आणि हिंसाचाराची खुली सूट हवी आहे. यामुळेच, अशा प्रकारच्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या केंद्रीय संस्थांना राज्यात हल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर हल्ला चढवला.
पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (एनआयए) पथकावर शनिवारी जमावाने हल्ला केला होता. या पथकाने 2022 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन मुख्य संशयितांना अटक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ही घटना घडली. यानंतर पंतप्रधानांनी हे भाष्य केले आहे.
येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना मोदी म्हणाले, “तृणमूल काँग्रेस सरकारला बंगालमध्ये लूटमार आणि दहशतीसाठी खुली सूट हवी आहे. आपल्या खंडणीखोर आणि भ्रष्ट नेत्यांचा बचाव करण्यासाठी टीएमसी, केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्ले करवते. जेव्हा त्या येथे काम करतात. तृणमूल काँग्रेस देशाच्या कायद्याची आणि संविधानाची अवहेलना करत आहे.”
संदेशखलीतील घटनांसंदर्भात लोकांना विश्वास देत मोदी म्हणाले, "या जघन्य गुन्ह्यातील दोषींना संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावे लागेल. संदेशखलीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप समोर आले आहेत. संदेशखलीमध्ये जे काही घडले ते संपूर्ण देशाने पाहिले आहे."
भूपतीनगरमध्ये डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. शहरातील सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना जामीन देण्यास नकार देत त्यांना 10 एप्रिलपर्यंत एनआयएच्या कोठडीत पाठवले आहे.