नवी दिल्लीः जामिया मिलिया इस्मालिया विद्यापीठ परिसरात एका तरुणानं नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलकांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यात जामियाचा एक विद्यार्थी जखमी झाला असून, त्यांचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. या सर्व प्रकारावर गोळीबार करणाऱ्या मुलाच्या आईचीसुद्धा प्रतिक्रिया आली आहे. माझ्या मुलाची मानसिक स्थिती दोन महिन्यांपासून ठीक नाही. त्याला सध्या उपचाराची गरज आहे. तो निर्दोष असून, त्याला अटक करू नका, अशी भावना गोळीबार करणाऱ्या मुलाच्या आईनं व्यक्त केली आहे.शेजारच्यांनी टीव्हीवर तुमच्या मुलाचा फोटो आणि व्हिडीओ दिसतो आहे, असं सांगितल्यानंतर मला हा सर्व प्रकार समजला. त्याच दरम्यान टीव्हीवर मुलाचा फोटो पाहून रडत रडत आई अनेकदा बेशुद्ध पडली. या घटनेनंतर मुलाचे वडीलसुद्धा गायब झाले आहेत. त्या अल्पवयीन मुलाची आई एका खासगी शाळेत शिक्षिका असून, वडील दुकान चालवतात. पण परिवाराची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. घरातील स्थिती चांगली नसल्यानं मुलगा नेहमीच शांत असायचा. त्याच्या मित्रांनीसुद्धा तो शांत असल्याचं बऱ्याचदा सांगितलं होतं. जेव्हा कोणी त्याला घालून पाडून बोलत होते, तेव्हा तो काहीही न बोलता तिथून निघून जायचा. दरम्यान, गोळीबाराचा प्रकार समजल्यानंतर वडिलांनी दुकान बंद केलं आणि मुलाला भेटण्यासाठी जात असल्याचं सांगून ते निघून गेले. परंतु रात्री उशिरापर्यंत त्यांचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. आरोपीला एक छोटा भाऊसुद्धा आहे, तो आठवी इयत्तेत शिकतो. तसेच तो हल्लेखोर विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेतील मॅनेजरनं सांगितलं की, मुलाचा जन्म दाखला दाखवला असून, तो अल्पवयीन असल्याचंही स्पष्ट झालेलं आहे. एप्रिल 2002मध्ये त्याचा जन्म झाला आहे.
Jamia Firing : मुलाला गोळीबार करताना टीव्हीवर पाहून आईला आली चक्कर; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 5:10 PM
जामियाचा एक विद्यार्थी जखमी झाला असून, त्यांचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत.
ठळक मुद्देजामियाचा एक विद्यार्थी जखमी झाला असून, त्यांचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. या सर्व प्रकारावर गोळीबार करणाऱ्या मुलाच्या आईचीसुद्धा प्रतिक्रिया आली आहे. माझ्या मुलाची मानसिक स्थिती दोन महिन्यांपासून ठीक नाही. त्याला सध्या उपचाराची गरज आहे.