नवी दिल्ली: जामिया विद्यापीठाचे विद्यार्थी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करत असताना त्यांच्या दिशेनं गोळी झाडणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. आज दुपारच्या सुमारास जामियाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना एकानं आंदोलकांच्या दिशेनं गोळी झाडली. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचं नाव रामभक्त गोपाल शर्मा असं असून तो ग्रेटर नोएडाचा रहिवासी आहे.गोळी झाडणारा गोपाल जामियाचा विद्यार्थी नाही. गोळी झाडण्याआधी गोपालनं अनेकदा जामिया परिसरातून फेसबुक लाईव्ह केलं. सध्या गोपालला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात दिल्लीतल्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आज मोर्चा काढला. यावेळी राजघाट परिसरात गोपालनं विद्यार्थ्यांच्या दिशेनं गोळीबार केला. गोपालनं केलेल्या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात असताना गोपालनं गोळीबार केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गोपालनं हातातली बंदूक आंदोलकांच्या दिशेनं रोखून धरली असताना त्याच्या पाठीमागे काही अंतरावर मोठ्या संख्येनं पोलीस दिसत आहेत. मात्र तरीही यातल्या एकाही पोलीस कर्मचाऱ्यानं बराच वेळ गोपालला ताब्यात घेण्यासाठी धाव घेतली नाही.
Jamia Firing : आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याआधी 'तो' होता फेसबुकवर LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 5:02 PM