बारामुल्ला: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला झाला आहे. बारामुल्लीतल्या क्रेझरी भागात सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये जम्मू काश्मीर पोलीस दलातील एक अधिकारी आणि सीआरपीएफच्या दोन जवानांना वीरमरण आलं.सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करून दहशतवाद्यांनी पळ काढला. हल्ल्यानंतर संपूर्ण परिसराला पोलिसांनी वेढा घातला आणि सर्च ऑपरेशन सुरू केलं. त्याआधी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. त्याला जवानांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. यावेळी सुरू असलेल्या कारवाईत पोलिसांचादेखील सहभाग होता. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले. गंभीर इजा झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय जम्मू काश्मीर पोलीस दलातील एका अधिकाऱ्यालादेखील दहशतवाद्यांविरुद्धच्या चकमकीत वीरमरण आलं. याआधी शुक्रवारीदेखील दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाला लक्ष्य केलं. श्रीनगरच्या बाहेर असलेल्या नौगाम बायपासजवळ दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला. यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांना वीरमरण आलं. या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याची माहिती जम्मू काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये सातत्यानं जवान आणि पोलीस पथकांवर दहशतवादी हल्ले होत आहेत. दोन दिवसांपूर्वी बारामुल्लातल्या सोपोरमध्ये लष्कराच्या तुकडीवर हल्ला झाला होता. त्यात एक जवान जखमी झाला होता.
काश्मीरमध्ये आठवड्याभरात तिसऱ्यांदा सुरक्षा दलांवर हल्ला; तिघांना वीरमरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 11:30 AM