श्रीनगर - गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून पोलिसांना वारंवार टार्गेट केले जाते. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी रात्री चार पोलिसांचं दहशतवाद्यांकडून अपहरण करण्यात आले होते. यातील तीन पोलिसांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. शोपियान जिल्ह्यातून हे चार पोलीस कर्मचारी बेपत्ता झाले होते. यातील तीन पोलिसांची हत्या करण्यात आल्याचे धक्कादायक शुक्रवारी सकाळी वृत्त समोर आले आहे. दरम्यान, एका पोलिसाची सुटका करण्यात आली आहे. ''राजीनामा द्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील'', अशी धमकी काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून या पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती.
दरम्यान, या कुकृत्यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे, हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. मात्र यामागे हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेनं पोलिसांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तीन विशेष पोलीस अधिकारी आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करण्यात आले होते. फिरदोस अहमद कुचे, कुलदीप सिंग, निसार अहमद धोबी, फयाज अहमद भाट अशी अपहरण करण्यात या पोलिसांचे अपहरण करण्यात आले होते. यातील फय्याज अहमद भाट यांची सुटका करण्यात आली आहे. या सर्व पोलिसांना कुटुंबीयांसमोरच बंदुकीचा धाक दाखवत अपहरण केल्याचे म्हटले जात आहे.
(भारतासह पाच देशांत ५९% दहशतवादी हल्ले, अमेरिकेचा अहवाल)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी काश्मीर पोलीस दलातील 6 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण केले होते. दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील पोलिसांच्या घरात घुसून कुटुंबीयांचे अपहरण केले. गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेऊन काही दहशतवाद्यांना अटक केली होती. या पार्श्वभूमीवर हे अपहरण म्हणजे पोलीस खात्यावर दबाव आणण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेली खेळी असल्याची माहिती पोलीस खात्यातील सूत्रांनी दिली होती.
यापूर्वी त्राल परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. या मुलाच्या कुटुंबीयांनी दयाभावना दाखवून दहशतवाद्यांनी आपल्या मुलाची मुक्तता करावी, अशी विनंती केली होती. या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाला होता.
तर काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना अटक केल्याचा तसेच त्यांच्या घरांना आग लावल्याचा आरोप करून काश्मीर खोऱ्यात निषेध आंदोलने करण्यात आली. दरम्यान, दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण करण्याची गेल्या 28 वर्षांमधील ही पहिलीच वेळ आहे.