श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी (28 मार्च) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शोपियन जिल्ह्यातील केलर भागात गुरुवारी चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या ही मोहिम राबवली.
Jammu and Kashmir : 'जैश ए मोहम्मद'च्या तीन दहशतवाद्यांना अटक
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षारक्षकांनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. 'जैश ए मोहम्मद'च्या तीन दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यांसह अटक करण्यात आली होती. जम्मू-श्रीनगर महामार्गावर सुरक्षारक्षकांनी रविवारी रात्री ही कारवाई केली. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे सदस्य असल्याची माहिती मिळत होती. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-श्रीनगर महामार्गावरुन एका कारमधून तीन जण प्रवास करीत होते. कारच्या तपासणीसाठी या तिघांना श्रीनगरच्या बाहेर परिमपोरा नाक्यावर थांबवण्यात आले. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांची कसून तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा असल्याचं समोर आलं. तीनही दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे सदस्य असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ भागात रविवारी (24 मार्च) पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते.
जम्मू-काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये रविवारी भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. भारतीय सुरक्षादलांनी अखनूर सेक्टरमधील पाकिस्तानी सैन्याचे तळ उद्धवस्त केले. पाकिस्तानने हा तळ अत्यंत गोपनीयरित्या उभारला होता. भारतीय लष्कराकडून पुरावा म्हणून याचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचा तळ दिसत आहे. तसेच त्यावर पाकिस्तानचा झेंडाही दिसून येत आहे.
जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांचे क्रुर कृत्य पुन्हा एकदा समोर आलेले आहे. काश्मीरच्या शोपिया, बांदीपोरा आणि सोपोरमध्ये या भागात दहशतवादी आणि जवानांमध्ये अनेक दिवसांपासून चकमकी होत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी क्रुर कृत्य केलं. 12 वर्षाच्या मुलाला ओलीस ठेवून दहशतवाद्यांनी त्याची हत्या केली. त्या मुलाच्या आई-वडिलांनी आर्त विनवणी करत आपल्या मुलाची सुटका करावी अशी हात दहशतवाद्यांना देत होते. मात्र आई-वडिलांच्या विनवणीनंतरही दहशतवाद्यांच्या हृदयाला पाझर फुटला नाही. अखेर त्या मुलाची दहशतवाद्यांनी हत्या केली. बांदीपोरा जिल्ह्यातील मीर मोहल्ला येथे 2 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. याच दहशतवाद्यांनी मुलाला ओलीस ठेवले होते. तर आणखी एका ओलीस ठेवलेल्या नागरिकाला सोडविण्यात पोलिसांना यश आलं. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या एका कमांडरचाही समावेश होता. शोपिया जिल्ह्यातील इमाम साहिब भागात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.