नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. श्रीनगरच्या बाहेर पंथाचौक भागात एका चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. पंथाचौक भागातील एका इमारतीमध्ये काही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानुसार पोलिस आणि सुरक्षा दलांनी त्या परिसराला घेराव घातला. दरम्यान इमारतीमध्ये लपलेल्या दहशवाद्यांनी गोळीबार केला.
गोळीबारामध्ये जम्मू-काश्मीर पोलीस दलातील तीन जवान आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एका जवान जखमी झाला आहे. त्यानंतर सुरक्षा दलांनी आक्रमक पावले उचलत कारवाईला सुरुवात केली. यामध्ये झालेल्या गोळीबारात इमारतीमध्ये लपलेल्या तीन दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. गेल्या 24 तासांत 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गुरुवारी सैन्याला मोठं यश मिळालं होतं. जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं होतं. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. यासंदर्भातील माहिती स्थानिक पोलीस प्रशासनानेच दिली आहे.
दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. ही कारवाई सुरक्षा यंत्रणांसाठी एक मोठं यश आहे.
सैन्याला मोठं यश! कुलगाम, अनंतनाग चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा
बुधवारी सायंकाळी दक्षिण काश्मीरमधील दोन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या कारवाया सुरू करण्यात आल्या होत्या. काश्मीर पोलिसांनीही ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली. सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून त्यापैकी चौघांची ओळख पटली आहे. यातील दोघे पाकिस्तानी असून इतर दोघे स्थानिक आहेत. इतर दोन दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. अनंतनागमधील नवगाम परिसरामध्ये झालेल्या चकमकीमध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या कर्मचाऱ्याला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.