श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या ९० जागांसाठी झालेल्या निवडणुकांत नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीने ४८ जागा जिंकत सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. नॅकॉने ४२ व काँग्रेसने ६ जागा जिंकल्या. नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस युतीमुळे काश्मीरमध्ये इंडिया आघाडीला मोठे यश प्राप्त झाले. या निवडणुकांत भाजपला २९, तर पीडीपीला ३ जागांवर विजय मिळाला.
आप पक्षाने एक जागा जिंकून आपले खाते उघडले असून जेपीसी, माकप यांनीही प्रत्येकी एक जागा जिंकली आहे, तर सात अपक्ष विजयी झाले आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी सांगितले की, ओमर अब्दुल्ला हे जम्मू- काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील. पीडीपीचा दारुण पराभव झाला असून पक्षप्रमुख महबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा यांना मुफ्ती श्रीगुफवारा-बिजबेहरा विधानसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. जनतेने दिलेला कौल मी मान्य केला आहे, असे महबूबा म्हणाल्या. नौशेरा मतदारसंघात पराभव झाल्याने रवींद्र रैना यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
कोण कुठे वरचढ ?
भाजपने जम्मू क्षेत्रात ४३ जागा लढविल्या होत्या. त्यातील २९ जागांवर विजय मिळाला. काश्मीर खोऱ्यात २० जागा लढविल्या, पण एकही जागा जिंकता आली नाही. काश्मीर खोऱ्यात नॅशनल कॉन्फरन्सला ४२ पैकी ३५ जागांवर विजय मिळाला. काँग्रेसने ६ जागांवर विजय मिळविला. २०१४ साली या आघाडीला खोऱ्यात २७ जागा प्राप्त झाल्या होत्या. नॅशनल कॉन्फरन्स हा प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय मित्र पक्ष काँग्रेसपेक्षा वरचढ ठरला आहे.
विजयाची ५ कारणे
नॅकॉ-काँग्रेसवर खोऱ्यातील जनतेने विश्वास दाखविला. पीडीपीच्या पराभवामुळेही नॅकॉ-काँग्रेसला लाभ झाला. भाजपला जम्मूत यशाची अपेक्षा होती. ते झाले नाही. राज्य दर्जासाठी लोकांनी नॅकॉ-काँग्रेसला निवडून दिले. नॅकॉ-काँग्रेसला पुन्हा संधी देण्याचे आवाहन प्रभावी ठरले.