जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 05:50 AM2024-10-09T05:50:38+5:302024-10-09T05:52:13+5:30
संसदेवर २००१मध्ये झालेल्या हल्ल्यातील दाेषी दहशतवादी अफझल गुरु याचा भाऊ ऐजाझ गुरु याला फक्त १२९ मते मिळाली. त्याच्यापेक्षा जास्त मते नाेटाला मिळाली.
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या मतदारांनी नॅशनल कॉन्फरन्स-काॅंग्रेस आघाडीवर विश्वास ठेवत सत्तेची चावी दिली आहे. भाजपला सत्ता मिळविण्यात अपयश आले असले तरीही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जास्त जागा जिंकून भाजप बाजीगर ठरला आहे.
भाजपने गेल्या निवडणुकीत २५ जागा जिंकल्या हाेत्या. तर यावेळी भाजपने २९ जागा जिंकल्या. ४ जागा जास्त जिंकत भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये सर्वाेत्तम कामगिरी नाेंदविली. त्याचवेळी, काॅंग्रेसने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ६ जागा गमाविल्या. नॅशनल कॉन्फरन्सने सर्वाधिक ४२ जागा जिंकल्या.
पीडीपीला माेठा धक्का
पीडीपीला सर्वात माेठा झटका बसला. जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीत भाजपच्या धाेरणांविराेधात नाराजी, पूर्ण राज्य, बेराेजगारी, कलम ३७० यासारखे मुद्दे प्रचारात हाेते. यापैकी काही मुद्दे काश्मीर खाेऱ्यात प्रभावी ठरलेले निकालावरुन दिसते.
फुटीरतावादी पक्षांचा प्रभाव नाही
- अवामी इत्तेहाद आणि जमात-ए-इस्लामी या फुटीरतावादी पक्षांना विधानसभा निवडणुकीत प्रभाव पाडता आला नाही. इंजिनीअर राशिदचा भाऊ खुर्शीद शेख हा लांगटे येथून विजयी झाला. मात्र, इतर उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त झाले.
- राशिद याच्या पक्षाने ४४ उमेदवार रिंगणात उतरविले हाेते. मात्र, अनेकांना ‘नाेटा’ पेक्षाही कमी मते मिळाली. सायर अहमद रेशी हा जमात-ए-इस्लामी या पक्षाकडून लढला. ताे पराभूत झाला, मात्र त्याने २५ हजारांपेक्षा जास्त मते घेतली.
- संसदेवर २००१मध्ये झालेल्या हल्ल्यातील दाेषी दहशतवादी अफझल गुरु याचा भाऊ ऐजाझ गुरु याला फक्त १२९ मते मिळाली. त्याच्यापेक्षा जास्त मते नाेटाला मिळाली.