सुरेश डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालेले नाही. तरीही हिंदूबहुल जम्मू प्रांतात भाजपने आपली पकड कायम राखली. भाजपने जम्मू प्रांताचा गड राखताना गेल्या निवडणुकीच्या तुलनेत चार जागा जास्त जिंकल्या आहेत. नॅशनल काॅन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला हेच मुख्यमंत्री हाेतील. सत्ता वाटपाचा मुद्दा नाही, असे पक्षाचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी जाहीर केले.
भाजपने २०१४च्या निवडणुकीत २५ जागा जिंकल्या हाेत्या, तर मेहबूबा मुफ्ती यांचा पीडीपी या पक्षाने सर्वाधिक २८ जागा जिंकल्या. त्यानंतर दाेन्ही पक्षांनी युती करून सत्ता स्थापन केली हाेती. यंदा पीडीपीला केवळ ३ जागाच जिंकता आल्या. भाजपला २.२३ टक्के मते जास्त मिळाली, मात्र, ‘एनसी’पेक्षा १३ जागा कमी मिळाल्या.
३२ उमेदवार काँग्रेसने उतरविले हाेते. त्यापैकी सहाजण जिंकले.
५१ जागा नॅशनल काॅन्फरन्सने लढविल्या. त्यापैकी ४२ जागा जिंकल्या.
६२ जागा भाजपने लढविल्या. त्यापैकी २९ जागा जिंकल्या.
भाजपला येथे बसला फटका
बानी व रामबन या दाेन हिंदूबहुल मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का बसला. बानी येथे भाजपचे जीवनलाल, तर रामबन येथे राकेश सिंह ठाकूर यांचा पराभव झाला.
‘आप’ने काश्मीरमध्ये खाते उघडले
आम आदमी पार्टीने (आप) जम्मू-काश्मीरमध्ये खाते उघडून सर्वांना चकित केले आहे. डाेडा येथून ३६ वर्षीय मेहराज मलिक यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. मेहराज मलिक पदवीधर असून त्यांच्याकडे २९ हजार रुपयांची संपत्ती आहे. गुजरात आणि गाेव्यानंतर आता जम्मूमध्येही पक्षाचा एक आमदार आहे. तसेच माेहम्मद युसूफ तारिगामी हे माकपचे एकमेव विजयी उमेदवार ठरले. त्यांनी सलग पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकली.
जम्मू-काश्मीर गेल्या पाच निवडणुकांचा इतिहास काय सांगतो?
पक्ष १९९६ २००२ २००८ २०१४नॅशनल कॉन्फरन्स ५७ २८ २८ १५काँग्रेस ७ २० १७ १२पीडीपी - १६ २१ २८जेकेएनपीपी १ ४ ३ -सीपीआय (एम) - २ १ १भाजप ८ १ ११ २५बसपा ४ १ - -अपक्ष २ १३ ४ ३