नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ७९वर्षीय सईद यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. व्हेंटिलेटरवर असताना सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. जम्मू-काश्मीर या मुस्लीमबहुल राज्यात भाजपासोबत अशक्यप्राय वाटणारी युती प्रथमच स्थापन करीत सत्ता मिळविण्याचा मान त्यांना जातो. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हामीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी तसेच अनेक केंद्रीय मंत्री आणि मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.सईद यांचे पार्थिव वायुदलाच्या विशेष विमानाने श्रीनगरला नेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिल्लीत पालम विमानतळावर जाऊन पुष्पचक्र अर्पण करीत अंत्यदर्शन घेतले. केंद्र सरकारने राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्याची घोषणा करीत एक दिवसाचा देशव्यापी दुखवटा तर जम्मू-काश्मीर सरकारने गुरुवारी सुटी व सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला. सईद यांना २४ डिसेंबर रोजी विशेष विमानाने श्रीनगरहून दिल्लीत आणल्यानंतर एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. छातीतील जंतुसंसर्ग आणि न्यूमोनियामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली आणि एक पुत्र आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती सईद यांचे निधन
By admin | Published: January 08, 2016 3:55 AM