Omar Abdullah on INDI alliance: गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतही त्याचा प्रत्यय आला. ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांच्यानंतर आता जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीच्या भवितव्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. इंडिया आघाडीची एकही बैठक होत नाही हे दुर्दैव आहे. असं असेल तर इंडिया आघाडी बंद करुन टाका असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडीच्या दिल्लीतल्या गोंधळावरही ओमर अब्दुल्ला यांनी भाष्य केलं.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे इंडिया आघाडीमध्ये मोठी फूट पडताना दिसत आहे. अशातच जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडी प्रश्न उपस्थित केले आहेत. ही आघाडी केवळ संसदेच्या निवडणुकीपुरती मर्यादित राहिली असेल, तर ती विसर्जित केली पाहिजे, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.
"दिल्लीत काय चालले आहे यावर मी काहीही बोलू शकत नाही कारण आमचा दिल्लीच्या निवडणुकीशी काहीही संबंध नाही. आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि तिथे असलेल्या इतर पक्षांनी भाजपचा मुकाबला कसा करता येईल हे ठरवावे. याआधी तिथे आम आदमी पार्टीला सलग दोनदा यश मिळाले होते. त्यामुळे जनतेला निर्णय घ्यावा लागेल," असं ओमर अब्दुल्ला म्हणाले.
"मला आठवत आहे त्यानुसार, इंडिया आघाडीसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नव्हती. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इंडिया आघाडीची एकही बैठक होत नाहीये. त्यामुळे आघाडीचे नेतृत्व, अजेंडा आणि अस्तित्व याबाबत स्पष्टता नाही. कदाचित दिल्लीच्या निवडणुका संपल्यानंतर इंडिया आघाडीतील सर्व पक्षांना बोलवले जाईल. जर ही आघाडी लोकसभेच्या निवडणुकीपुरती मर्यादित असेल तर त्यांनी ती संपवायला हवी. विरोधी पक्षांमध्ये ऐक्याचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे," असंही ओमर अब्दुल्ला म्हणाले.
दरम्यान, दिल्ली निवडणुकीबाबत आप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असताना ओमर अब्दुल्ला यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे विरोधी इंडिया आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. भाजपविरुद्ध विरोधकांना एकत्र करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली होती. मात्र गेल्या काही काळात विविध पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले असून त्यामुळे इंडिया आघाडीचे भविष्य धोक्यात आलं आहे.