"EVM चे रडगाणे थांबवा, आता हवे तसे निकाल येत नाहीत"; ओमर अब्दुल्लांचा काँग्रेसला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:50 IST2024-12-16T11:50:11+5:302024-12-16T11:50:28+5:30
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेस पक्षाचे ईव्हीएमवरील आरोप फेटाळून लावले आहेत.

"EVM चे रडगाणे थांबवा, आता हवे तसे निकाल येत नाहीत"; ओमर अब्दुल्लांचा काँग्रेसला सल्ला
Omar Abdullah On EVM: हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस ईव्हीएमविरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. मात्र आता जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावला आहे. काँग्रेसने ईव्हीएमवर रडणे थांबवावे आणि आपला पराभव स्वीकारावा, असा सल्ला मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी दिला. तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम ठीक असते, पण जेव्हा तुम्ही हरता तेव्हा तुम्ही ईव्हीएमबद्दल रडायला लागता, असंही ओमर अब्दुलांनी म्हटलं. यावर काँग्रेसनेही जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ईव्हीएम छेडछाडीचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावत काँग्रेसलाही या मुद्द्यावरुन गोंधळ घालणं थांबवण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री अब्दुल्ला यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर आमचे सहकारी असे का वागत आहेत, असा सवाल काँग्रेसने केला आहे.
"पराभवासाठी ईव्हीएमला बळीचा बकरा बनवू नये. ईव्हीएममधून शंभरहून अधिक खासदार निवडून आल्यावर तुम्ही त्या विजयाचा आनंद साजरा करता. पण काही महिन्यांनी ईव्हीएम योग्य निकाल देत नाही, असे म्हणता येणार नाही. कारण, आता निवडणुकीचे निकाल हवे तसे येत नाहीत," असं ओमर अब्दुल्ला यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं.
काँग्रेस नेते मणिकम टागोर यांनी ओमर अब्दुल्ला यांना प्रत्युत्तर दिलं आहे. "समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ईव्हीएमविरोधात बोलले आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला कृपया तुमची तथ्ये तपासा. काँग्रेसने स्पष्टपणे सीडब्ल्यूसी प्रस्ताव केवळ निवडणूक आयोगासमोर मांडला. मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांबद्दल अशी वृत्ती का?," असा सवाल मणिकम टागोर यांनी केला.