नवी दिल्ली - कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरमधील तणावाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी शोपिया जिल्ह्यातील नागरिकांची भेट घेतली. या प्रकरणावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पैसे देऊन लोकांना सोबत घेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
कलम 370 हटवल्याच्या विवादानंतर गुलाम नबी आझाद आज श्रीनगरला जाण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणात ते कार्यकर्त्यांशी बैठक घेण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणावरुन काँग्रेस नेत्यांमध्ये दोन गट पडल्याचं चित्र समोर आलं आहे. काही काँग्रेस नेत्यांचे म्हणणं आहे की, केंद्र सरकारकडून कलम 370 हटविण्याचा निर्णय योग्य आहे. तर काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे.
पत्रकारांनी गुलाम नबी आझाद यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काश्मीरमधील सामान्य लोकांना भेटत आहेत, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना आझाद म्हणाले की, पैसे देऊन तुम्ही कोणालाही सोबत घेऊ शकता. काश्मिरी लोकांवर कर्फ्यू लावण्यात आला आहे हे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे. त्यावर भाजपाचे नेते शाहनवाज हुसैन यांनी पलटवार करत काँग्रेस पक्ष पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गुलाब नबी यांच्या वक्तव्याचा फायदा पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नबी यांनी केलेल्या विधानाबाबत तात्काळ माफी मागावी, असेही भाजपानं सांगितले.
जम्मू-काश्मीरमधील स्थिती सध्या तणावग्रस्त आहे. फुटिरतावादी नेत्यांकडून राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो या कारणास्तव खबरदारी म्हणून अनेक ठिकाणी जवान तैनात आहेत. गुरुवारी सकाळी येथील बाजारपेठा उघडण्यात आल्या. जम्मूतील लोकं दैनदिन व्यवहार करण्यासाठी बाहेर पडू लागले आहेत. तर दुसरीकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कलम 370 हटविण्याच्या मुद्द्यावरुन देशाला संबोधित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यावर काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.