जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी सकाळपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये दोन वेगवेगळ्या चकमक सुरू आहेत. अनंतनागमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर श्रीनगरच्या खानयारमध्ये सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले. ज्या घरात दहशतवादी लपले होते, तिथे मोठा स्फोट झाला आहे. यानंतर घराला भीषण आग लागली. परिसरात धुराचे लोट दिसत आहे.
लष्कराचे अनेक जवान या कारवाईत जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. यामध्ये दोन सीआरपीएफ आणि दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खानयारमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यामध्ये एक मोठा कमांडर असून तो लपून मोठा कट आखत असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर परिसराला सुरक्षा जवानांनी वेढा घातला.
सकाळपासून सुरक्षा कर्मचारी दहशतवादी बाहेर येण्याची वाट पाहत होते. मात्र ते सतत गोळीबार करत होते, त्यात चार जवान जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, घरात लपलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराने असे काही रसायन वापरले आहे की, घराच्या एका भागाला आग लागली आणि आत लपलेले दहशतवादी धूर पाहून बाहेर येतील.
खानयारमध्ये अधूनमधून गोळीबार सुरू आहे. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये सुरक्षा दल दहशतवाद्यांचे लपलेले ठिकाण शोधून त्यांना घेरताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये गोळीबार आणि स्फोटांचे आवाजही येत आहेत. २ ते ३ दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आणि सीआरपीएफची संयुक्त कारवाई सुरू आहे.