श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (12 फेब्रुवारी) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर दोन जवान शहीद झाले आहेत. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. पुलवामामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त
रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या आसपास सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशनच्या 6 तासांनंतर जवानांनी दहशतवादी ज्या घरात लपले होते, ते घरच स्फोटकांनी उडवले. या कारवाईदरम्यान, 5 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. सध्या जवानांकडून परिसरात शोध मोहीम राबवण्यात येत आहे. शोध मोहिमेदरम्यान जवानांनी दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठा आणि अन्य साहित्यही जप्त केले. मिळालेल्या माहितीनुसार, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये एका मोस्ट वॉन्डेट दहशतवादी कमांडरचाही सहभागी असू शकतो. मात्र भारतीय लष्कराकडून याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.