श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील चारी शरीफ परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी (21 जानेवारी) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. बडगाममध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.
भारतीय लष्कराचा मोठा स्ट्राईक; पाकचे 12 बंकर्स उद्ध्वस्त, 5 रेंजर्संना कंठस्नान
जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर भारतीय लष्कराने याआधी 17 जानेवारी रोजी पाकिस्तानी सैन्यावर मोठी कारवाई केली होती. पाकिस्तानच्या 5 जवानांना ठार करण्यात आलं असून पाकचे अनेक बंकर्सही उद्ध्वस्त करण्यात आले होते. सीमारेषेवर पाकिस्तानी रेंजर्सकडून शस्त्रीसंधीचे वारंवार उल्लंघन होत आहे. पाकच्या या पुळचट कारवायांना भारतीय लष्कराने चांगलेच प्रत्युत्तर दिले. पुंछ आणि राजौरी क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या पाच रेंजर्संना कंठस्नान घातले होते. यासोबतच पाकचे 12 बंकर्सही उद्धवस्त केल्याची माहिती लष्करी कारवाईचे अधिकारी रणबीर सिंग यांनी दिली होती.