श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे रविवारी (22 जुलै) पहाटेच्या सुमारास सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. चकमकीदरम्यान जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. परिसरात 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलानं परिसराला घेराव घातला. यानंतर एन्काऊंटर सुरू करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाममधील खुदवानी परिसरातील वानी मोहल्ला येथे एन्काऊंटर सुरू आहे. परिसरातील एका घरामध्ये दहशतवादी लपले आहेत. सध्या दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. खबरदारी म्हणून जवानांनी संपूर्ण परिसर रिकामा केला आहे.
दरम्यान, शनिवारी (21 जुलै) जम्मू काश्मीर पोलीस दलातील पोलीस शिपाई सलीम शाह यांचे दहशतवाद्यांनी अपहरण करुन निर्घृण हत्या केली. सलीम शाह दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथील रहिवासी होते. शनिवारी सकाळी पोलिसाचे अपहरण करून नंतर हत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह कुलगाम परिसरात आढळून आला. कथुआमध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई सलीम शाह सध्या रजेवर होते. कुलगाम जिल्ह्यातील मुथलामा भागातील त्यांच्या घरातून दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. अलीकडेच आणखी एका पोलीस व जवानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. नंतर त्यांना मारून टाकण्यात आले.
अनंतनाग जिल्ह्यातही शनिवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलाने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात मट्टनस्थित बमजू भागात अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला.