Jammu and Kashmir : पाकव्याप्त काश्मीर सुद्धा भारत घेणार, पाकच्या माजी उच्चायुक्तांचा दावा
नवी दिल्ली : भारतात काम करतेवेळी भाजपाचे वरिष्ठ नेते राम माधव यांनी म्हटले होते की, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 आणि कलम 35 ए हटविण्यात येईल. तसेच, पाकव्याप्त काश्मीर सुद्धा भारत परत घेईल, असे पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानमधून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानाच्या एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात अब्दुल बासित यांनी सांगितले की, 'ऑक्टोबर 2014 मध्ये त्यांची भाजपाचे वरिष्ठ नेते राम माधव यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावेळी काश्मीरसंबंधी भारताने मोठा निर्णय घेण्याबाबत तयारी केली होती असे राम माधव यांनी म्हटले होते.'
अब्दुल बासित म्हणाले, "राम माधव यांच्या कार्यालयात आमची बैठक जवळपास एक तास सुरु होती. त्यावेळी त्यांनी असे सांगितले की, ते मी याठिकाणी सांगू शकत नाही. मात्र, त्यांच्याकडून जो मेसेज मिळाला तो स्पष्ट होता...हाय कमिश्नर साहेब, पाकिस्तान आता आपला वेळ वाया घालवत आहे. हा जो मुद्दा आहे, तो तुम्ही समजून घेणार की हुर्रियत हुर्रियत खेळत बसणार. या मुद्दा आता संपला असे समजा. कलम 370 आहे ते पण हटेल आणि 35 ए पण रद्द होईल...तुम्ही चिंता करा की तुमच्याकडून पाकव्याप्त काश्मीर सुद्धा घेतले जाऊ नये.... हा एकप्रकारे इशारा होता."
याचबरोबर, अब्दुल बासित म्हणाले, "आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जातील आणि म्हणतील, जर भारत-पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करणार असला तर तुम्ही पाकव्याप्त काश्मीरवर मध्यस्थी करा. जो अद्याप पाकिस्तानच्या ताब्यात आहे."