श्रीनगर - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरसह देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. याच दरम्यान जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी सैन्याच्या एका टीमवर ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्ल्यात चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील खानबलच्या शमशीपोरा बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास सॅनिटेशन ड्रिलदरम्यान दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या रोड ओपनिंग पार्टीवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ग्रेनेड हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीवर तीन दहशतवाद्यांचा खात्मा
काही दिवसांपूर्वी जम्मू जिल्ह्यात एलओसीवर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं होतं. मात्र यावेळी झालेल्या चकमकीत चार जवान जखमी झाले होते. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव जवानांनी उधळून लावला. पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी जोरदार गोळीबार सुरू केला होता. या गोळीबारात सैन्याचे चार जवान जखमी झाले होते. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव फसला. भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता.
सन २०२० मध्ये २१५ दहशतवाद्यांचा खात्मा; अत्याधुनिक शस्त्रांनी सुरक्षादल होणार मजबूत
सन २०२० मध्ये एकूण २१५ दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला, अशी माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक डॉ. ए.पी. माहेश्वरी यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २०२० मध्ये खात्मा करण्यात आलेल्यांमध्ये रियाज नायकूसह अनेक वॉन्टेड दहशतवाद्यांचा समावेश आहे. विविध चकमकीत एकूण २१५ दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले, असेही ते म्हणाले. कोब्रा फोर्सच्या नक्षलविरोधी पथकात आता महिला योद्धांचाही समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. महासंचालक डॉ. ए.पी. माहेश्वरी यांनी सांगितले की, केंद्रीय राखीव पोलीस दलात आता यूएवी, ट्रॅकर्स, असॉल्ट रायफल्स यांचाही समावेश करण्यात आला आहे. नवीन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच शस्त्रे यांच्या मदतीने केंद्रीय राखीव पोलीस दल आणखी मजबूत केले जाणार आहे, असे ते म्हणाले.