श्रीनगर: राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे आज काश्मीर दौऱ्यासाठी रवाना झाले होते. जम्मू-काश्मीरकाँग्रेसचे अध्यक्ष गुलाम अहमद हेही त्यांच्यासोबत होते. परंतु सुरक्षा यंत्रणेकडून आझाद यांना श्रीनगर विमानतळावर रोखण्यात आलं आणि नंतर माघारी पाठविण्यात आलं. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. त्यामुळेच आझाद यांना परत पाठवल्याचं समजतं.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी शोपिया जिल्ह्यातील नागरिकांची भेट घेतली. त्यावर गुलाम नबी आझाद यांनी टीका केली होती. पैसे देऊन लोकांना सोबत घेत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
भाजपाचे नेते शाहनवाज हुसेन यांनी पटलवार करत काँग्रेस पक्ष पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा टोला लगावला. तसेच गुलाब नबी यांच्या वक्तव्याच्या फायदा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर करेल असंही त्यांनी सुनावलं.