नवी दिल्ली- जम्मू आणि काश्मीर राज्य सरकार कोसळल्यानंतर या राज्यात राज्यपालांची राजवट लागू करण्यात आली आहे. सध्य़ाचे राज्यपाल एन.एन वोहरा यांच्या पदाचा कार्यकाळ 25 जून रोजी समाप्त होत आहे. सलग दोन वेळा राज्यपालपदी राहिलेल्या वोहरा यांना आता पुन्हा काही वर्षांचा कार्यकाळ मिळणे शक्य दिसत नाही. वोहरा यांच्या जागी काही नावांची चर्चा सुरु झाली आहे. असे असले तरी 28 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरु होत असल्यामुळे वोहरा यांना तात्काळ पदावरुन दूर केले जाणार नाही.
ले. ज. (निवृत्त) सय्यद अता हस्नैन- जम्मू काश्मीर राज्याच्या राज्यपालपदी सय्यद अता हस्नैन यांची निवड होऊ शकते. श्रीनगर येथील चिनार दलाच्या कमांडरपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. हस्नैन यांचा सामान्य लोकांशी संपर्कही आहे. 2010-11 या काळामध्ये ते जनरल ऑफिसर इन कमांडिग पदावरती कार्यरत होते. 12 इन्फ्रंट्री ब्रिगेडचे ते कमांडर होते.
दिनेश्वर शर्मा- राज्यपालपदाच्या चर्चेमध्ये सर्वात आघाडीवर शर्मा यांचे नाव आहे. सध्या केंद्र सरकारचे जम्मू आणि काश्मीरमधील विशेष प्रतिनिधी म्हणून ते कार्यरत आहेत. दिनेश्वर शर्मा इंटेलिजन्स ब्युरोचे माजी प्रमुख आहेत. 1979 साली ते केरळ कॅडरमधून प्रशासकीय सेवेत आले. त्यांनी अजित डोवल यांच्याबरोबरही काम केले आहे.
राजीव मेहर्षी-1979 च्या राजस्थान कॅडरमधून प्रशासकीय सेवेत पदार्पण केलेले राजीव मेहर्षी जवळजवळ 4 दशके प्रशासकीय सेवांमध्ये आहेत. त्यांनी विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे. मेहर्षी सध्या भारताचे महालेखापाल असून संयुक्त राष्ट्रांच्या बोर्ड ऑफ ऑडिटर्सचे अध्यक्ष आहेत.
एएस. दुलत-अमरजित सिंह दुलत हे रॉचे माजी प्रमुख आहेत. पीडीपी- भाजपा सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही असे त्यांनी गेल्या काही काळामध्ये वारंवार सांगितले होते. काही तज्ज्ञांच्या मते ते जम्मू आणि काश्मीर राज्याचे पुढील गव्हर्नर असू शकतात. त्यांनी श्रीनगरमध्ये आयबीचे विशेष संचालक म्हणून काम केले आहे. त्यांनी काश्मीर- द वाजपेयी इयर्स आणि द स्पाय क्रोनिकल्स रॉ, आयएसआय अँड द इल्युजन ऑफ पीस या पुस्तकांचे लेखन केले आहे.