श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 7 जण जखमी झाले आहेत. पुलवामाच्या त्राल बसस्थानकावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात सात नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, त्राल येथील बस स्थानकावरील एसएसबी जवानांवर हा ग्रेनेड हल्ला केला. मात्र त्यांचा निशाणा चुकला आणि रस्त्यावरच ग्रेनेडचा स्फोट झाला. यामध्ये सात नागरिक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी हल्ल्यानंतर तातडीने संपूर्ण परिसर सील करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील श्रीनगरपासून काही अंतरावर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले होते. 25 डिसेंबर 2020 रोजी दहशवादी आणि सुरक्षादलांमध्ये काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील कैगाम भागात जोरदार चकमक झाली होती. भारतीय सीमेत घुसखोरी केलेल्या तीन दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला भारतीय सुरक्षादलांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला आणि भारतीय सैन्यातील दोन जवान जखमी झाले होते.