श्रीनगर: जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर तेथील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आता सरकारने जम्मू- काश्मीर आणि लडाखच्या विकासाची आखणी देखील सुरु केली आहे. त्यासाठी जम्मू- काश्मीरमध्ये लवकरच नोकरभरती सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज (बुधावारी) पत्रकार परिषदेत केली आहे.
राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले की, आगामी दोन- तीन महिन्यात जम्मू- काश्मीर आणि लडाखमध्ये सरकारी खात्यातील ५० हजार जागा रिक्त असून या जागेवर लवकरच मेगाभरती करणार आहे. त्यामुळे या भरतीचा फायदा या राज्यातील तरुणांनी घ्यावा असे आवाहन मलिक यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे येत्या दोन दिवसांत काश्मीरच्या विकासाच्या दृष्टीने काही मोठ्या घोषणा करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे आगामी सहा महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये अनेक महत्त्वाची कामं करण्यासाठी केंद्राच्या विविध मंत्रालयाच्या बैठका सुरू आहेत. राज्यात विकास व्हावा, ही सरकारची इच्छा असून त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
तसेच राज्यातील जनतेला विविध अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील परिस्थिती सुधारत असून तेथील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येणार आहेत. तसेच अनेक ठिकाणी लॅडलाइन सेवा चालू करण्यात आली आहे, तर जम्मू मधील सर्व 10 जिल्ह्यांमधील मोबाईल सेवा देखील सुरु करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे हळूहळू इंटरनेट सेवाही पूर्वपदावर आणण्याचं आवश्वासन त्यांनी पत्रकार परिषदेत दिलं.