श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमधील लाल चौकात असलेल्या प्रेस एन्क्लेव्हच्या इमारतीवर पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकला आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमधील प्रेस एन्क्लेव्हवर तिरंगा शान के साथ फडकला आहे. केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या फडकलेल्या झेंड्याचे फोटोही शेअर केले आहेत. काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा फडकावणे हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा मुद्दा राहिला आहे. दहशतवाद्यांविरोधातील लढाईला बळ देण्यासाठीही हा मुद्दा नेहमीच महत्त्वाचा मानला जातो. यापूर्वी 26 जानेवारी 1992 सालीही लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आला होता. भाजपा नेते मुरलीमनोहर जोशी यांच्या नेतृत्वात प्रजासत्ताक दिनी लाल चौकात तिरंगा फडकला होता.
एकता यात्रेनंतर 1992 मध्ये फडकला होता तिरंगा
सन 1992 मध्ये प्रजासत्ताक दिनी लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आला होता. त्यामध्ये, पतंप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश होता. तत्पूर्वी डिसेंबर 1991 मध्ये भाजपाने कन्याकुमारी येथून एकता यात्रा सुरु केली होती. जी अनेक राज्यांतून काश्मीरमध्ये पोहोचली. काश्मीर हे भारताचेच आहे, त्याला वेगळं होऊ देणार नाही. तिरंग्याला येथेही सन्मान देणार, असा संदेश या एकता यात्रेतून देण्यात आला होता.
लाल चौक कायम चर्चेत
दरम्यान, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम 370 हटविण्यात आले आहे. 5 ऑगस्ट 2019 च्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर येथे तिरंगा फडकविण्याबाबत सातत्याने चर्चा होत होती. लेहचे खासदार जामयांग सेरिंग नांग्याल यांनी ऑगस्ट 2020 रोजी आपल्या ट्विटमधून याचे संकेतही दिले होते. जो लाल चौक कधी खानदानी जहागीर होती, दहशतवादी कारवायांचं प्रतिक होतं. तो लाल चौक आता राष्ट्रवादाचा मुकूट बनलाय, असे ट्विट जामयांग यांनी केलं होतं.