जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळली आहे. याच दरम्यान, पुंछमधील मंडी भागातील बेदार गावात भूस्खलनामुळे अनेक घरांचं नुकसान झालं. तसेच किश्तवाड भागात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.
हवामान सुधारणा होईपर्यंत आणि रस्ता मोकळा होईपर्यंत NH-44 वरून प्रवास टाळण्याचा सल्ला लोकांना देण्यात आला आहे. किश्तवाडमधील कचोन गावात भूस्खलनामुळे प्राथमिक शाळेसह सहा घरांचं मोठं नुकसान झाले. डोडा, किश्तवाड आणि कुपवाडा जिल्ह्यात शाळा बंद करण्यात आल्या आहेत. उधमपूर जिल्ह्यातील डूडू-बसंतगड, कुलवंता आणि पंचारी भागात आज शाळा बंद राहणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. पर्वतीय भागात हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे, तर झेलम नदी सामान्य पातळीपेक्षा जास्त वेगाने वाहत आहे. रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी अचानक पूर आला. हंदवाडा आणि कुपवाडा जिल्ह्यांसह उत्तर काश्मीरमध्ये अनेक निवासी घरे आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
दरम्यान, उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा भागातील गुरेझ खोऱ्यात बर्फवृष्टी झाली. यानंतर अधिकाऱ्यांनी बांदीपोरा जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. येत्या 24 तासांत संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अनेक उंचीच्या भागात आणि राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळण्याची शक्यता आहे.