श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये घडत असलेल्या सततच्या दहशतवादी घटनांमुळे घाबरलेले अनेक स्थलांतरित कर्मचारी आपापल्या राज्यात परत जात आहेत. अशा परिस्थितीत काश्मीरच्या विभागीय आयुक्तांनी शनिवारी काश्मीरच्या 10 जिल्ह्यांच्या उपायुक्तांना आदेश दिला की, कोणताही स्थलांतरित कामगार राज्य सोडणार नाही याची खात्री करा आणि जर कोणी अनुपस्थित राहिल्यास त्याच्यावर सेवा नियमांनुसार कारवाई करा.
काही दिवसांपूर्वीच एका शाळेत शीख प्राचार्य आणि काश्मिरी हिंदू शिक्षकाची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. यानंतर असुरक्षित वाटणारे अनेक कर्मचारी जम्मू-काश्मीरमधून परत आपापल्या राज्यात जात आहेत. या लोकांनी प्रशासन असंवेदनशील असल्याचा ठपका ठेवला आहे. जम्मूला परतलेले बरेच लोक कामानिमित्त घाटीत परतण्याबाबत साशंक आहेत. तर काहींनी तूर्तास न येण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत तक्रारी
कर्मचारी म्हणाले की, जीव धोक्यात घालून कर्मचारी जम्मूला आले आहेत. त्यांना सुरक्षा कशी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यांची भीती दूर करण्याऐवजी, आवश्यक सुरक्षा व्यवस्था करणे, त्यांना सुरक्षेचे आश्वासन देण्याऐवजी प्रशासन सेवा नियमांनुसार कारवाईची धमकी देत आहे. शनिवारी आयुक्त पांडुरंग पोल यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. त्यात सुरक्षेबाबत विविध विषयांवर चर्चा झाली.