श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये मोठे राजकीय फेरबदल घडले आहेत. जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी राजीनामा दिला आहे. आता निर्मल सिंह यांच्या जागी कविंद्र गुप्ता हे जम्मू-काश्मीरचे नवे उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. कविंद्र गुप्ता हे सध्या जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, सोमवारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असून, अनेक नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात येणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपा यांचे संयुक्त सरकार आहे.
कथुआ बलात्कार प्रकरणामध्ये भाजपाच्या काही मंत्र्यांनी आरोपींचे समर्थन करण्याची भूमिका घेतल्यानंतर जम्मू-काश्मीर सरकारमधील भाजपाच्या मंत्र्यांवर चौफेर टीका झाली होती. त्यानंतर सुरुवातीला दोन आणि त्यानंतर उर्वरित 9 अशा राज्य मंत्रिमंडळातील भाजपाच्या सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. दरम्यान, रविवारी रात्री उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनीही पदावरून पायऊतार होण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, राजकीय फेरबदलासंदर्भात कविंद्र गुप्ता म्हणालेत की, 'पक्षानं माझ्यावर विश्वास ठेवला आहे. या विश्वासाला तडा जाऊ नये, यासाठी मी प्रयत्न करेन. तसंच कथुआ सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू''.
यावेळी पीडीपीसोबतच्या संबंधांसोबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाबाबत त्यांनी सांगितले की, पीडीपीसोबत चांगलं संबंध स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू. शिवाय, युतीच्या सरकारमध्ये सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचाही आमचा प्रयत्न असेल. आम्ही संपूर्ण जम्मू काश्मीर आणि लदाखला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांचा विकास करण्यासंदर्भात काम करू.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मल सिंह यांना जम्मू काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष बनवले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, मेहबूबा मुफ्ती यांच्या मंत्रिमंडळात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सत शर्मा, शक्ती परिहार, राजीव जसरोतिया, मन्याल आणि रविंद्र रैना यांचा समावेश केला जाणार असल्याची चर्चा आहे.