श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी (7 मार्च) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये हंदवाडा परिसरात गुरुवारी पहाटे चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. चकमकीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
Jammu And Kashmir : त्राल चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्माजम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (5 मार्च) पहाटेपासून चकमक सुरू झाली होती. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. तसेच याआधी जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून चकमक सुरू होती. या चकमकीदरम्यान रविवारी (3 मार्च) दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. मात्र, दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले असून नऊ जवान जखमी झाले होते. या चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील दोन कर्मचारी शहीद झाले आहेत. तर नऊ जवान जखमी झाले असून यामध्ये दोन सीआरपीएफचे जवान आहेत आणि सात लष्कराचे जवान आहेत.
पाकिस्तानकडून ठाणी, खेड्यांवर गोळीबारपाकिस्तानच्या लष्कराने बुधवारी जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांत नियंत्रण रेषेवरील काही ठाणी आणि खेड्यांवर तोफांचा मारा केला. संपूर्ण रात्रभर सुंदरबनी (राजौरी जिल्हा) सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार आणि तोफमारा सुरू होता तर बुधवारी पहाटे कृष्णा घाटी (जिल्हा पूंछ) सेक्टरमध्ये तो सुरू झाला, असे अधिकाऱ्याने सांगितले. या माऱ्याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले व दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू राहिल्यामुळे सीमेवर राहणाऱ्यांच्या मनात घबराट निर्माण झाली. पाकिस्तानने मंगळवारीही नौशेरा आणि सुंदरबनी आणि कृष्णा घाटीत गोळीबार केला होता.