जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला. कानपूरचा शुभम द्विवेदीचाही यामध्ये मृत्यू झाला. त्याचं दोन महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. तो पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह फिरायला गेला होता. ज्या वेळी दहशतवाद्यांनी त्याला गोळ्या घातल्या, त्यावेळी त्याच्यासोबत फक्त त्याची पत्नी होती. कुटुंबातील बाकीचे सदस्य खाली होते. शुभमच्या भावाने याबाबत माहिती दिली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला कानपूरचा शुभम द्विवेदी याचा चुलत भावाने भयंकर परिस्थिती सांगितली आहे. तो म्हणाला की, दहशतवाद्यांनी शुभमला सांगितलं की जर मुस्लिम असाल तर कलमा वाचून दाखवं. जेव्हा उत्तर दिलं नाही तेव्हा दहशतवाद्यांनी भावाच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर वहिनी म्हणाली की, मलाही मारून टाका, तेव्हा दहशतवाद्यांनी वहिनीच्या डोक्यावर बंदूक ठेवली आणि म्हणाले की तुला मारणार नाही. आम्ही काय केलं आहे ते तुमच्या सरकारला जाऊन सांगा असं म्हटलं.
" तुम्ही मुस्लिम आहात का?"
भावाने सांगितलं की, "भाऊ आणि वहिनी मॅगी खात होते तेव्हा अचानक दोन पुरुष त्यांच्याकडे आले आणि विचारलं, तुम्ही मुस्लिम आहात का? त्यानंतर गोळी झाडली. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या भावाच्या शेजारी वहिनी बसली होती. या घटनेला सरकारने योग्य उत्तर दिलं पाहिजे. जेणेकरून दहशतवाद्यांनी असं भ्याड कृत्य करू नयेत आणि कोणत्याही भारतीयावर गोळीबार करण्यापूर्वी विचार करावा."
" भावाचा मृतदेह लवकरात लवकर पाठवावा"
"वहिनी सध्या ट्रोमामध्ये आहेत. सरकारने भावाचा मृतदेह लवकरात लवकर पाठवावा. शुभमचे वडील संजय द्विवेदी हे कानपूरमध्येच सिमेंटचे व्यापारी आहेत. शुभम आणि कुटुंबीय बुधवारी जम्मू आणि काश्मीरहून परतणार होतं." शुभमच्या मृत्यूची बातमी समजताच सर्वांना मोठा धक्का बसला आहे. अमरनाथ यात्रा सुरू होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच हा हल्ला झाला आहे, ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
सोशल मीडिया आणि स्थानिक बातम्यांमधून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेने दहशतवाद्यांनी तिच्या पतीला केवळ मुस्लिम नसल्याचं सांगितल्यामुळे गोळ्या घातल्याचं म्हटलं आहे. महिला आपल्या पतीला वाचवण्यासाठी लोकांना आवाहन करत होती.प्रत्यक्षदर्शींचे म्हणणं आहे की. ते शेवपुरी खात होते तेव्हा दहशतवादी तिथे आले आणि तुम्ही मुस्लिम आहात का? अशा प्रश्न विचारला. त्यानंतर नाव विचारलं आणि गोळीबार केला.