जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीकडून सत्ता स्थापनेचा दावा; काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 08:53 PM2018-11-21T20:53:20+5:302018-11-21T21:23:35+5:30

मेहबूबा मुफ्ती यांचं राज्यपाल सत्यपाल मलिक यांना पत्र

jammu and kashmir pdp mehbooba mufti writes to governor stake the claim for forming government | जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीकडून सत्ता स्थापनेचा दावा; काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचा पाठिंबा

जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीकडून सत्ता स्थापनेचा दावा; काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचा पाठिंबा

Next

श्रीनगर: पीडीपीनं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. आपल्याकडे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं पत्र पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना दिलं आहे. मात्र यावरुन पीडीपीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. पीडीपीचे आमदार इमरान अन्सारीदेखील राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. आपल्यासोबत 18 आमदार असल्याचा दावा अन्सारी यांनी केला आहे. 




मार्च 2015 मध्ये भाजपा आणि पीडीपीनं जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन केलं होतं. मात्र यावर्षीच्या जून महिन्यात भाजपानं सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर जवळपास सहा महिने राज्यात राज्यपाल राजवट लागू आहे. आता माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. आपल्याकडे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं त्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 

राज्याला देण्यात आलेला विशेष दर्जा टिकवण्यासाठी पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस एकत्र येत असल्याचं मुफ्ती यांनी 'आज तक' या वृत्तवाहिनीला सांगितलं. 'राज्याचा विशेष दर्जा आणि कलम 35 ए याकडे आमचं प्रामुख्यानं लक्ष आहे. हा मुद्दा जानेवारीत उपस्थित झाला होता. तेव्हा मी मुख्यमंत्री होते आणि मी याला विरोध केला होता. काश्मिरी जनतेनं यासाठी प्राणांची आहुती दिली आहे. त्यावेळी अनेक बदलांबद्दल चर्चा सुरू होत्या. मात्र ते बदल जनतेच्या हिताचे नव्हते,' असं मुफ्ती यांनी म्हटलं. 

मोदी सरकारचा जम्मू-काश्मीरकडे पाहण्याचा दृष्टीकोन चिंताजनक असल्याचं मुफ्ती यांनी सांगितलं. 'राज्याचा विशेष दर्जा टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. सध्या पीडीपी या आघाडीचं नेतृत्व करेल. मात्र यावर अद्याप पुढील चर्चा व्हायची आहे,' असं त्या म्हणाल्या. नॅशनल कॉन्फरन्स या सरकारमध्ये सहभागी होणार की फक्त बाहेरुन पाठिंबा देणार, या प्रश्नाला थेट उत्तर देणं मुफ्ती यांनी टाळलं. याबद्दलचा निर्णय अद्याप झालेला नाही, असं त्यांना सांगितलं. 

सध्या विधानसभेतलं समीकरण काय?
जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत एकूण 89 जागा आहेत. यापैकी 2 सदस्यांची नियुक्ती केली जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत सत्ता स्थापनेसाठी 44 आमदारांचा पाठिंबा लागतो. सध्या विधानसभेत पीडीपीचे 28, भाजपाचे 25, नॅशनल कॉन्फरन्सचे 15 आणि काँग्रेसचे 12 आमदार आहेत. त्यामुळे पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस एकत्र आल्यास हा आकडा 55 वर जातो.

Web Title: jammu and kashmir pdp mehbooba mufti writes to governor stake the claim for forming government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.