नवी दिल्ली: जम्मू- काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करत राज्याचे विभाजन करण्यात आले आहे. यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(दि.8) सायं. 4 वा. आकाशवाणीद्वारे पहिल्यांदाच देशाला संबोधित करणार असल्याचे ट्विट आकाशवाणीच्या हवाल्याने एएनआय(ANI)ने केले होते. मात्र काही वेळापूर्वीच आकाशवाणीने हे ट्विट डिलीट केल्याचे एएनआयने स्पष्ट केले. त्यामुळे मोदी देशाला आज खरंच संबोधित करणार का, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.
दरवर्षी 15 ऑगस्टला नरेंद्र मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करतात. मात्र, त्या आधीच त्यांनी जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरुन लोकांना संबोधित करण्याची चर्चा रंगली होती. यावेळी ते देशाच्या जनतेला कलम 370 रद्द करण्यामागची कारणे आणि फायदे सांगण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
केंद्र सरकारने मंगळवारी जम्मू आणि काश्मीरचे 370 कलम बदलून जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख यांचे विभाजन करत केंद्रशासित प्रदेश बनविले आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचे प्रस्तावित विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. यानंतर मंगळवारी लोकसभेत कलम 370 वर वादळी चर्चा झाल्यानंतर हे विधेयक 351 विरुद्ध 72 मताधिक्याने पारित झाले. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारचा ऐतिहासिक विजय झाला आहे.