श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून भीतीचे, दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. येथील कुलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी पाच मजुरांची हत्या केली आहे. हे सर्व मजूर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येते.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी मजुरांवर हल्ला केला. या हल्ल्यात पाच मजुरांचा मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. हे मजूर रोजंदारीवर काम करण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये आले होते. ते मुळचे पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचे समजते. याचबरोबर, या घटनेनंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. तसेच, या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून सुरक्षा दलाच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील विशेष दर्जा देणारे कलम 350 रद्द केल्यानंतर दहशतवादी या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, काश्मीर खोऱ्यातील जनतेमध्ये भय निर्माण करण्याचे प्रयत्न दहशतवाद्यांकडून करण्यात येत आहेत. गेल्या आठवड्याभरात ट्रक चालकावरील हल्ल्याची ही घटना चौथी आहे. काल दहशतवाद्यांनी अनंतनागमध्ये आणखी एका ट्रक चालकाची हत्या केली होती. याआधी शोपियॉंमध्ये तीन ट्रक चालकांची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.