जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला स्वायत्त राज्याचा दर्जा काढून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सोमवारी जाहीर केला. गेली सात दशकं चर्चेचा, वादाचा विषय ठरलेल्या कलम ३७० मधील वादग्रस्त कलमं सरकारने रद्द केली. तसंच, जम्मू-काश्मीर हा एक आणि लडाख हा दुसरा केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येईल, असं जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचं, विभाजनाचं विधेयकही राज्यसभेत मंजूर झालं. या निर्णयाचं बहुतांश जनता स्वागत करतेय. आम आदमी पार्टी, बसपा यांच्यासारख्या कट्टर विरोधकांनीही मोदी सरकारच्या या भूमिकेला पाठिंबा दिला. याउलट, काँग्रेसनं कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला आणि जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेला विरोध केला आहे. ३७० कलम रद्द करून काश्मीरच्या अस्तित्वालाच भाजपाने नख लावले असून हे कृत्य घटनाविरोधी आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी काल दिली होती. त्यानंतर आज राहुल गांधी यांनीही या निर्णयाला विरोध केला आहे.
काँग्रेसची ही भूमिका तुम्हाला पटते का?, की मोदी सरकारने घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटतो? नोंदवा आपलं मत...