ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 3 - उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील एका तुरुंगात विघातक साहित्यासहित 14 मोबाइल फोन आढळून आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगातून जप्त करण्यात आलेल्या मोबाइलचा वापर फुटीरतावादी आणि सीमेपलिकडील देश पाकिस्तानातील लोकांशी संवाद साधण्यासाठी करण्यात येत होता, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी काही कैद्यांविरोधात एफआयआर दाखल करुन त्यांची चौकशी सुरू केली आहे. तसंच फॉरेन्सिक टीमकडून मोबाइल डेटाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. बारामुल्लातील तुरुंगात मोबाइल आणि अन्य साम्रगीचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत 14 फोन जप्त करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपचाही वापर करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
तुरुंगातील काही फुटीरतावाद्यांकडे विघातक साहित्यही आढळून आली आहे, ज्यांचा संबंध शोधण्यात येत आहे. फॉरेन्सिक टीमकडून तपासणी पूर्ण झाल्यानंतरच या फुटीरतावाद्यांचे सीमेपलिकडील लोकांशी काही संबंध आहे का याची माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी दहशतवादी जम्मू काश्मीरमधील एका पोलीस अधिका-याच्या घरात घुसले होते. तेथे अंदाधुंद गोळीबार करत या दहशतवाद्यांनी वाहन पेटवलं होतं. हा पोलीस अधिकारी घाटीतील त्यांच्या घरात घुसून कुटुंबीयांना त्रास द्यायचा, असं या दहशतवाद्यांचं म्हणणं होतं आणि याचाच बदला त्यांनी घेतल्याचा दावाही केला.
श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, एक पोलीस शहीद
जमू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद तर 11 जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यात सीआरपीएफचे चार जवान तर पोलिसांचे सात जवान जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नशरी चेनानी या बोगद्याचे उद्घाटन केल्यानंतर हा हल्ला झाला. पंतप्रधान मोदी येणार आहेत म्हणून श्रीनगर बंद ठेवावे, असे आवाहन फुटीरतावाद्यांनी केले होते.
रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास नौहट्टा येथील गंजबक्ष पार्कमध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जम्मू - काश्मीर दौऱ्यावर येणार असल्याने सकाळपासून तैनात असलेले अधिकारी सायंकाळच्या वेळी थोडा वेळ आराम करत होते. त्याच वेळी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला.