श्रीनगर - काश्मिरात शुक्रवारच्या निर्बंधांनंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी बहुतांश भागांत निर्बंध हटविण्यात आले आहे. शहराच्या अनेक भागांतून रस्त्यांवरील बॅरिकेटस् हटविण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सुरक्षा दलांना तैनात ठेवण्यात आले आहे.
शुक्रवारच्या नमाजच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता खोऱ्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. केवळ अॅम्ब्युलन्स आणि आपत्कालीन परिस्थितीत लोकांना ये-जा करण्यास परवानगी होती. काश्मिरात सलग 27 व्या दिवशी जनजीवन विस्कळीत झालेले आहे. बाजारपेठा, शाळा बंद आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, काश्मिरात परिस्थिती सुधारत असताना बहुतांश ठिकाणी लँडलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमधूनकलम 370 हटविल्यानंतर तेथील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. जम्मूमधील पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा काही दिवसांपूर्वी पुन्हा सुरू करण्यात आली. तसेच याआधी जम्मू काश्मीरमधील शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये सुरू झाली आहेत. डोडा, रामबन, राजौरी, पूंछ आणि किश्तवाड या पाच जिल्ह्यांतील मोबाईल सेवा सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूमधील पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. 5 ऑगस्ट रोजी ही सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता 25 दिवसांनी डोडा, रामबन, राजौरी, पूंछ आणि किश्तवाड या पाच जिल्ह्यांतील मोबाईल सेवा सुरू करण्यात आली. मात्र काही जिल्ह्यातील मोबाईल सेवा ही अद्याप ठप्पच आहे. कलम 370 आणि कलम 35 अ बाबत केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तसेच राज्यातील बहुतांश भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र काही दिवसांनंतर हळूहळू निर्बंध हटवण्यात आले होते .
जम्मू- काश्मीर आणि लडाखच्या विकासाची आखणी सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी जम्मू- काश्मीरमध्ये लवकरच नोकरभरती सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बुधवारी (28 ऑगस्ट) पत्रकार परिषदेत केली आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितले की, आगामी दोन- तीन महिन्यात जम्मू- काश्मीर आणि लडाखमध्ये सरकारी खात्यातील 50 हजार जागा रिक्त असून या जागेवर लवकरच मेगाभरती करणार आहे. त्यामुळे या भरतीचा फायदा या राज्यातील तरुणांनी घ्यावा असे आवाहन मलिक यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे येत्या दोन दिवसांत काश्मीरच्या विकासाच्या दृष्टीने काही मोठ्या घोषणा करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.