श्रीनगर - काश्मीर खोऱ्यातील इंटरनेट सेवा शुक्रवारी (9 ऑगस्ट) काही प्रमाणात शिथिल करण्यात आली आणि नमाजासाठी काही काळ लोकांना बाहेर पडण्याचीही सूट देण्यात आली. त्यानंतर आता जम्मूमधील शाळा व महाविद्यालये आजपासून सुरू होत आहेत. जम्मूमधून कलम 144 (जमावबंदी) हटवण्यात आले आहे. तसेच अद्यापही काही भागातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जम्मूच्या उपायुक्त सुषमा चौहान यांनी दिली आहे.
बकरी ईदमुळे काश्मीरमधील निर्बंध काही प्रमाणात कमी करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मात्र लोकांना वस्तीच्या जवळपास तसेच बाजारात जाण्याचीच परवानगी आहे. बाजार व दुकानेही सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच खुली ठेवण्याची परवानगी आहे. काश्मीर खोऱ्यात अद्याप सर्वत्र हाय अॅलर्ट असून, लोकांच्या वर्दळीवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. उधमपूर व सांबा जिल्ह्यांतील शाळा व महाविद्यालये शुक्रवारी सुरू झाली. जम्मूतील शाळा सुरू झाल्या असल्या तरी काश्मीर खोऱ्यातील शाळा कधी सुरू होणार, हे स्पष्ट झालेले नाही.
श्रीनगरची सर्वात मोठ्या जामा मशिदीची दारे अद्याप बंदच आहेत. केवळ लहान मशिदींमध्ये नमाज अदा करण्याची मुभा देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान जम्मू-काश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशांच्या विभाजनाच्या कायद्यावर शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सह्या केल्या. मात्र ही राज्ये केव्हापासून अस्तित्वात येणार, हे स्पष्ट झालेले नाही.
जमावबंदी कायम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 370 कलमाच्या निर्णयाचे देशात सर्वत्र स्वागत झाले असून जम्मू-काश्मीरमधील स्थिती सुरळीत होत आहे, असा दावा गुरुवारी केला होता. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये सर्वत्र जमावबंदी लागू असून, नेहमीपेक्षा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यातूनच खरी वस्तुस्थिती कळून येते, अशी टीका डाव्या पक्षांनी केली आहे.
जम्मू काश्मीरची विधानसभा आणि लोकप्रतिनिधींबाबत मोदींनी केली मोठी घोषणा
केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या कलम 370 आणि कलम 35 अ हटवण्याबाबत घेतेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी जम्मू-काश्मीरमधील विधानसभा आणि लोकप्रतिनिधींबाबत मोठी घोषणा केली. जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश असला तरी येथे विधानसभा असेल. तसेच काश्मिरी जनतेला आधीप्रमाणेच आपले लोकप्रतिनिधी निवडता येतील, असे नरेंद्र मोदींनी सांगितले. तसेच नरेंद्र मोदी म्हणाले की, फाळणीनंतर अनेक लोक पाकिस्तानमधून भारतात आले. मात्र त्यावेळी काश्मीरमध्ये गेलेल्या निर्वासितांना अद्याप मताधिकार मिळालेला नाही. तसेच 'आज या संबोधनामधून मी जम्मू काश्मिरी जनतेला आश्वस्त करून इच्छितो की, जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश घोषित झाला असला तरी येथे विधानसभा असेल आणि मुख्यमंत्रीही असेल. तसेच येथील जनता पूर्वीप्रमाणेच आपले आमदार निवडून देऊ शकतील. जम्मू-काश्मीरमधील व्यक्तींना पूर्ण पारदर्शकपणे आपला लोकप्रतिनिधी निवडता येईल. तसेच लवकरच येथे निवडणुका होतील', अशी माहिती मोदींनी दिली आहे.