श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्येदहशतवाद्यांनी पीडीपी नेत्याच्या घरावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पीडीपी नेत्याचे सुरक्षा रक्षक (पीएसओ) गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतंं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यातील नाटीपोरा भागात सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) नेता हाजी परवेज यांच्या घरावर हल्ला केला. यामध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक मंजूर अहमद गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. "माझी मुलं, वृद्ध आई आणि अन्य कुटुंबीय घरात होते. तेव्हा सकाळी दोन हल्लेखोर मुख्य दरवाज्यातून आत आले."
"दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर गोळीबार सुरू केला. यानंतर पीएसओकडून देखील गोळीबार सुरू करण्यात आल्यावर हल्लेखोरांनी पळ काढला" अशी माहिती परवेज यांनी दिली आहे. याआधी जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेत भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आलं आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; एकाला जीवंत पकडलं
सुरक्षा दलाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दहशतवाद्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती. पूंछच्या दुर्गन पोशणा भागात रविवारी दुपारपासून दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू होती. त्यानुसार कारवाई दरम्यान दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. तर एकाला अटक करण्यात आली आहे. दहशतवाद्यांच्या एक गटाने गेल्या तीन दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमधून पूंछमध्ये घुसखोरी केली आहे आणि ते शोपियानच्या दिशेने निघाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. शुक्रवारपासून सुरक्षा दल या दहशतवाद्यांचा मागोवा घेत आहे.