श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात बुधवारी (30 जानेवारी) एका पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात तीन नागरिक जखमी झाले आहेत.
दहशतवाद्यांनी कुलगाम जिल्ह्यामधील दमहाल हांजीपुरातील एका पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला केला. दहशतवाद्यांनी फेकलेला ग्रेनेड रस्त्याशेजारी पडला आणि यात तीन नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर जवानांनी परिसराला घेरावबंदी घालत हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान,गेल्या 5 दिवसांत काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी 20 हून अधिक वेळा ग्रेनेड हल्ले केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ग्रेनेड हल्ला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केला आहे. यापूर्वी झालेल्या हल्ल्याची जबाबदारीही जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेनं घेतली होती.