श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. श्रीनगर आणि आसपासच्या परिसरात जवळपास 24 दहशतवादी दिसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परिसरातील दुकानदारांना हे दहशतवादी धमकी देत असल्याने सुरक्षा दलाची चिंता वाढली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी या परिस्थितीचा उपयोग नागरिकांना भडकावण्यासाठी करणार नाहीत यासाठी सुरक्षा दल सतर्क असून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे.
कलम 370 आणि कलम 35 अ बाबत केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तसेच राज्यातील बहुतांश भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. पण जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर तेथील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. मात्र काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती अद्याप बिकट आहे. श्रीनगर परिसरात अनेक ठिकाणी दहशतवादी आढळून आले आहेत. तसेच ते उघडपणे परिसरातील दुकानदारांना धमकी देत आहेत. त्यांना दुकाने बंद ठेवण्यास आणि त्यांचा आदेश पाळण्यास सांगत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जम्मू-काश्मीर पोलीस प्रमुख दिलबाग सिंह यांनी दहशतवादी आढळल्याची शक्यता नाकारली नाही. पण ते उघडपणे फिरतात ही अतिशयोक्ती असल्याचं म्हटलं आहे. सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार केला जात आहे. भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून दररोज सुरू आहे. या वर्षात पाकिस्तानने 2050 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यामध्ये 21 भारतीयांना प्राण गमवावा लागला. पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवार एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. पाकिस्तानने आपल्या सुरक्षा दलांना शस्त्रसंधीचे पालन करण्याच्या सूचना द्याव्यात, असे भारताने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पाकिस्ताननं नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शांतता राखावी, असे आवाहन भारताकडून करण्यात आले आहे. भारताकडून पाकिस्तानच्या गोळीबाराला जशास तसं उत्तर दिलं जात आहे. याशिवाय पाकिस्तानी सैन्याच्या मदतीनं होणारी घुसखोरी रोखण्याचे प्रयत्नदेखील सुरू आहेत.