ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 1 - जम्मू काश्मीरमधील सोपोर येथील नाथी पोरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
चकमकीनंतर परिसरात सध्या शोधमोहीम सुरू आहे. राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.
दरम्यान, बुधवारी (31 मे) सोपोरमध्ये पोलीस दलावर ग्रेनेड फेकण्यात आले होते. या भ्याड हल्ल्यात चार पोलीस जखमी झाले होते. पेट्रोलिंग करत असताना पोलिसांवर हल्ला करण्यात आला. बुधवारी दुपारी 4.10 वाजण्याच्या सुमारास सोपोर येथे एका बँकेजवळ तैनात पोलिसांच्या गटावर ग्रेनेड फेकण्यात आल्याने चार पोलीस जखमी झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर जखमी पोलिसांना तातडीनं उपचारांसाठी जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
याआधीही, जम्मू-काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातील पोलीस कॅम्पवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. यामध्ये एक नागरिक जखमी झाला होता. येथील इमाम साहिब येथील पोलीस कॅम्पला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. मात्र, कॅम्पच्या रस्त्यावर ग्रेनेड पडल्याने मोठी दुर्घटना टळली होती.
दरम्यान, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून बँक लुटण्याच्या आणि पोलिसांवर हल्ले करण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे दिसून येत आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच कुलगाम जिल्ह्यातील कादर येरीपोरा परिसरात असलेल्या इलाकाई देहाती बॅंकेत दोन दहशतवाद्यांनी दरोडा टाकून 65, 000 रुपयांची रोकड लुटून पोबारा केला होता. तर कुलागाम येथील एका बॅंकेच्या एटीएम कॅशव्हॅनला दहशतवाद्यांनी लक्ष्य करत 50 लाख रुपयांची रोकड लुटली होती. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये 5 पोलिसांचा समावेश होता. तसेच, दोन गार्डचीही समावेश होता.
दरम्यान, हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सबजार भट सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत मारला गेल्यापासून काश्मीर खोरे हिंसक निदर्शनांनी धुमसत आहे. अनंतनाग आणि शोपिया जिल्हा आणि दक्षिण काश्मीरमधील पुलवामा शहरात तसेच बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काश्मीर खोऱ्यातील दहा जिल्ह्यांपैकी चार जिल्ह्यांतील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
स्थिती नियंत्रणात
28 मे रोजी काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या असल्या, तरी एकूण स्थिती नियंत्रणात आहे. पुलवामा, कुलगाम, शोपिया आणि सोपोर या ठिकाणी 28 मे रोजी दगडफेकीच्या घटना घडल्या; परंतु काश्मीर खोऱ्यातील स्थिती शांत आणि नियंत्रणात आहे, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले. पोलीस आणि सुरक्षा दले उपद्रवखोरांचा मुकाबला करीत स्थिती हाताळताना कमालीचा संयम बाळगून कारवाई करीत आहेत.
मोबाइल इंटरनेट सेवा बंद
प्रशासनाने काश्मीर खोऱ्यातील मोबाइल इंटरनेट सेवा बंद केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्री-पेड नंबरवरील दुसरीकडे कॉल करण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. काश्मीर विद्यापीठाने सोमवारी आणि मंगळवारी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. श्रीनगरमधील शाळा, महाविद्यालये सोमवारी बंद ठेवण्यात आली होती, तर पुलवामामध्ये दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहेत.
दोन्ही जिल्ह्यांत कलम १४४
मध्य काश्मीरमधील बडगाम आणि गंदेरबल जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात शनिवारी सुरक्षा दलाच्या चकमकीत सबजार भट आणि त्याचा साथीदार मारला गेला होता.
J&K: 2 local terrorists killed in joint operation by RR troops &police based on specific intelligence (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/xrcmjYwTH3— ANI (@ANI_news) June 1, 2017
J&K: Pak Army initiated indiscriminate firing of small arms, automatics & mortars along LoC in Naushera & KG sectors, since early morning. pic.twitter.com/spK2uimJp4— ANI (@ANI_news) June 1, 2017