कुलगाम, दि. 2 - जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथील बेहीबाग येथे दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरु आहे. सुरक्षा जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केलं असून, चकमक अजून थांबलेली नाही. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एके-४७ रायफल जप्त करण्यात आली आहे. इशफाक पड्डेर असं या मृत दहशतवाद्याचं नाव असून तो लष्कर-ए-तोयबाचा स्थानिक संघटक होता. त्याच्यावर अनेक नागरिकांच्या हत्येचे आरोप आहेत. याबाबत ‘एएनआय’सह लष्कराच्या उत्तर कमांडने आणि दक्षिण काश्मिर पोलिसांच्या पोलिस उपमहानिरिक्षकांनी ट्विटद्वारे माहिती दिली. ‘एएनआय’च्या माहितीनुसार, या चकमकीनंतर शोपियन आणि कुलगाम भागातील मोबाईल इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे.
दरम्यान आज बकरी ईद असल्याने अनेक लोक नमाजसाठी घराबाहेर पडत आहेत. श्रीनगरमधील राडपोरा येथे हजारो मुस्लिम नमाज पठन करण्यासाठी जमा झाले आहेत. या सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारीही सुरक्षा यंत्रणांवर असल्याने योग्य ती काळजी घेतली जात आहे.
दरम्यान गुरुवारी श्रीनगरमधील पंथा चौकात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात पाच पोलीस जखमी झाले होते. यामधील एका जवान शहीद झाला आहे. पेट्रोलिंग करताना दहशतवाद्यांनी पंथा चौकात पोलिसांच्या बसवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात सहा पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता एका जवानाचा मृत्यू झाला. लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना हा हल्ला केला असल्याचं सांगितलं जात आहे.
हल्ल्याची माहिती मिळताच संपुर्ण वाहतूक रोखण्यात आली होती. फायरिंगचा आवाज ऐकू येत असल्याने नागरिकांमध्ये थोड्या वेळासाठी गोंधळ आणि भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. श्रीनगरमधील पंथा चौक हा गर्दीचा परिसर आहे. परिसराला घेरण्यात आलं आहे. पोलीस पथकावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच, लगेच जवळ असणा-या कॅम्पमधून लष्कर जवान आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी आत्मघाती हल्ला करण्याच्या हेतूने आले होते. पंथा चौकात अशा अनेक इमारती आहेत जिथे दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. सध्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
याआधी जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात सीमा सुरक्षा दलाचे सहायक उपनिरीक्षक शहीद झाले होते.
गेल्या आठवड्यात दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील पोलीस लाईनवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात दोन जवान शहीद झाले, तर पाचजण जखमी झाले आहेत. तीन सशस्त्र दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. पुलवामाच्या या तळावर सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस मोठ्या संख्येने आहेत. या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलीस दलाचा एक आणि सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला.