श्रीनगर, दि. 28 - भारतीय लष्कराकडून हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेतील टॉपच्या कमांडर मारले गेल्यानंतर आता दहशतवादी टोळींचे म्होरके 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेची मदत घेत आहेत, असा दावा जम्मू काश्मीर पोलिसांकडून करण्यात आला आहे. एवढंच नाही तर आपले टॉपच्या कमांडरचा खात्मा होत असल्याच्या निराशेतून काश्मीर खो-यात अनेक ठिकाणी ते दहशतवादी हल्लेदेखील घडवून आणत आहेत. पुलवामा जिल्हा मुख्यालयाच्या पोलीस वसाहतीत शनिवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) चार जवान, काश्मीरचे तीन विशेष पोलीस अधिकारी व एक पोलीस शिपाई असे आठ जण शहीद झालेत. हुतात्म्यांमध्ये सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यातील हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनावडे यांचाही समावेश आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात 3 दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला.
'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेकडून मोठ्या प्रमाणात आत्मघातकी हल्ले केले जातात आणि गेल्या काही वर्षांमध्ये ही संघटना काश्मीरच्या उत्तरेकडील भागातही सक्रीय आहे. दरम्यान, ही संघटना आता काश्मीर खो-यात आपले हात-पाय पसरवत असल्याचे दिसत आहे. काश्मीर पोलीसचे आयजी मुनीर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबाचे टॉपचे कमांडर्सचा खात्मा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवायांसाठी आता जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेची मदत घेतली जात आहे. खान यांनी असेही सांगितले की, दक्षिण काश्मीर विशेषतः त्राल, पुलवामा आणि शोपियान परिसरात जैश-ए-मोहम्मदच्या सक्रीय दहशतवाद्यांची संख्या जवळपास 10-12 एवढी असावी. दरम्यान या जैश-ए-मोहम्मदकडून अशा प्रकारचे हल्ले 1990 सालापासून होत आहेत.
शनिवारी पहाटे सुरू झालेली चकमक संध्याकाळी संपलीपुलवामा जिल्हा मुख्यालय पोलीस वसाहतीत अनेक पोलीस आपल्या कुटुंबांसह राहतात. मात्र त्यांच्या कुटुंबीयांवर अतिरेक्यांनी हल्ला केला नाही वा कुटुंबीयांपैकी कोणाला ओलीसही ठेवले नाही. सुरुवातीला दहशतवाद्यांची संख्या तीन ते चार असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. एक अतिरेकी सकाळीच ठार झाला. संध्याकाळी गोळीबार पूर्णत: थांबला, तेव्हाच अतिरेक्यांची संख्या तीन होती, हे स्पष्ट झाले.पाकच्या तीन रेंजर्सचा खात्माजम्मू : पाकिस्तानी सैन्याने जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या पडगवाल भागात गोळीबार केला. तथापि, सीमेवर तैनात भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पलटवार करून प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानांच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचे तीन रेंजर्स ठार झाले, असे सीमा सुरक्षा दलाच्या अधिका-याने सांगितले.धनावडे यांच्या निवृत्तीला शिल्लक होते केवळ आठ महिनेकाश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनावडे (वय ३८ रा. मोहोट, ता. जावळी, जि. सातारा) हे शहीद झाले. निवृत्तीला अवघे सात महिने उरले असताना धनावडे यांना वीरमरण आले. सैन्य दलाने शनिवारी सायंकाळी मेढा पोलीस ठाण्यात फोन करून या दुर्दैवी घटनेची माहिती दिली. मोहोट येथील धनावडे कुटुंबीयांना ते शहीद झाले असल्याचे कळवायला पोलीस लगेच रवाना झाले. रवींद्र धनावडे हे हुतात्मा झाल्याचे समजताच मेढासह परिसरात शोककळा पसरली आहे. रवींद्र धनावडे हे मार्च २०१८ मध्ये निवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.