श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे.तिक्केन परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांनी मिळाली होती. यानंतर राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपनं घटनास्थळावरुन धाव घेत परिसराला घेराव घातला. यानंतर तेथे चकमक उडाली. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरू झाला. अखेर जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. घटनास्थळावरुन दोन रायफल ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे. लियाकत अहमद आणि वाजिद असे ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत. या कारवाईदरम्यान परिसरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, 6 नोव्हेंबरला शोपियानमध्येही जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीतही दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. मोहम्मद इदरीस सुलतान आणि आमिर हुसैन रैदर अशी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं होती. या दोघांचाही दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.