श्रीनगर : जम्मू- काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. मोहम्मद इदरीस सुलतान आणि आमिर हुसैन रैदर अशी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत. या दोघांचाही दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुसाठा जप्त करण्यात आला आहे.
यापूर्वी शनिवारीदेखील शोपियान जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या परिसरात जवानांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम राबवली होती. यादरम्यान, हिजबुल मुजाहिदीनचे इरफान अहमद भट व शाहिद अहमद मीर हे दहशतवादी ठार झाले.खुदपोरमध्ये काही दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यामुळे सुरक्षा दलांनी या भागात शनिवारी संध्याकाळी शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केला. त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले व आणखी दोन जण तेथून पळून गेले. भट हा गेल्या वर्षी दहशतवादी कारवायांत सामील होता. मीरवर २००४ सालातील एका शस्त्रचोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या दोघांकडून काही शस्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला. शाहिद मीर हा गागरान गावचा तर भट हा बांडझू गावचा रहिवासी आहे.
(जवानांनी स्नायपर्सला घातले कंठस्नान, दहशतवादी मसूद अझरच्या भाच्याचा खात्मा)सुरक्षा दलाकडून अधिक दक्षताकाश्मीरमध्ये हिवाळ्याच्या आधी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर घुसखोरीचे प्रयत्न होतात. हिवाळा सुरू झाला की, हिमवृष्टीमुळे घुसखोरीचे मार्ग नोव्हेंबर ते मे या काळात बंद होतात. घुसखोरी करून आलेल्या दहशतवाद्यांच्या घातपाती कारवाया हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दले सज्ज असतात पण हिवाळ्यात तर त्याबाबत अधिक काळजी घेतली जाते.